हापूस कलमांना पालवी येण्यास सुरुवात झाल्यामुळे आंबा बागायतदारांना यंदाच्या हंगामाची चाहूल लागली आहे. पुढील पंधरा दिवसांत वातावरणातील बदलांनुसार कलमांना पालवी येत राहणार आहे. यंदा ७० टक्के कलमांना पहिल्या टप्प्यात नैसर्गिकरीत्या पालवी येत राहील, असा अंदाज आहे. ज्या कलमांना पालवी येणार नाही, ती नोव्हेबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोरतील त्यासाठी थंडी आणि उन असे वातावरण आवश्यक आहे, असे बागायतदारांनी सांगितले. गतवर्षी तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात झाडांना मोहोर आल्यामुळे शेवटच्या टप्प्यात उत्पादन चांगले मिळाले होते. त्यामुळे यंदा बहुसंख्य झाडांना पालवी येण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरअखेरीस सलग चार दिवस पडलेल्या उन्हाच्या तापामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २० टक्के झाडांना पालवी दिसू लागली आहे. समुद्रकिनारी, खाडीकिनारी परिसरात हे प्रमाण अधिक आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस झाडांना सतत पालवी येत राहील. ही पालवी जुन होऊन त्यामधून मोहोर बाहेर पडण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडेल. त्या काळात अति थंडीमुळे थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे बागायतदारांना मोहोर वाचविण्यासाठी महागड्या औषधांचा वापर करावा लागतो.
ती वापरूनही जेवढा मोहोर वाचेल, त्यातून किती उत्पादन मिळेल त्यावर बागायतदाराचे सर्वकाही अवलंबून राहणार आहे. पालवी न आलेली झाडे किती टक्के राहतील यावर पहिल्या टप्प्यातील उत्पादन अवलंबून राहणार आहे. अशा झाडांना नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होईल. त्यामधून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंबा उत्पादन हाती येईल. त्यादृष्टीने आंबा बागायतदार तयारी लागले आहेत. सध्या ठिकठिकाणी बागांचा साफसफाई सुरू झाली आहे. पुढील पंधरा दिवसानंतर हंगामाचे चित्र निश्चित होणार आहे.