31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा

जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा...

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...
HomeRajapurटोल वसुली सुरू करण्याची नेमकी घाई का ? राणेंचा आक्रमक पवित्रा

टोल वसुली सुरू करण्याची नेमकी घाई का ? राणेंचा आक्रमक पवित्रा

नीलेश राणे यांनी जोपर्यंत टोलवसुली बंद करीत नाही, तोपर्यंत टोलनाक्यावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत हातिवले येथील टोलवसुली रोखली.

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आल्यापासून काही न काही अडचणी सुरूच आहेत. या टोलनाक्यावर ठेकेदाराला टोलवसुली करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी काल पासून टोलवसुलीला सुरूवात केली. परंतु, टोलवसुली सुरवात झाल्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शवला. यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी ठेकेदाराशी संवाद साधून तत्काळ टोलवसुली स्थगित करण्याची सूचना केली. त्यानंतर नीलेश राणे गुरुवारी स्वतः हातिवले टोलनाका येथे आले होते.

अद्यापही रस्त्याचे काम अपूर्ण असून अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे असताना टोल वसुली सुरू करण्याची नेमकी घाई का ? असा सवाल करीत माजी खासदार नीलेश राणे यांनी जोपर्यंत टोलवसुली बंद करीत नाही, तोपर्यंत टोलनाक्यावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत हातिवले येथील टोलवसुली रोखली. सर्व पक्षीयांसमवेत टोलनाक्यावर राणे यांनी ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र यावेळी नीलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेला सर्वांनी पाठिंबा दिला. सर्वपक्षीय कार्यकर्ते, वाहन चालक, व्यापारी संघटना, चिरेखाण संघटना यांनी ‘नीलेश राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करीत जोरदार पाठिंबा दिला.  ठेकेदार कोण?  याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. आमचा टोल वसुलीला विरोध नाही, पण अपुऱ्या रस्त्याच्या कामामुळे आम्ही टोल देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. आपल्या वरिष्ठांशी बोलून घ्या अन् तत्काळ टोलवसुली थांबवावी. नाहक संघर्ष करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही राणे यांनी दिला.

या ठिकाणी दाखल झालेल्या शासकीय अधिकारी प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांच्याशीही राणे यांनी संवाद साधला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती देत त्वरित टोलवसुली थांबवण्याची मागणी केली.

RELATED ARTICLES

Most Popular