एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत असताना राज्यातील काही भागात मात्र उन्हाळ्याच्या झळा वाढत आहेत. हवामान विभागाने राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, ठाणे, मुंबई या भागातील नागरिकांनाही दक्षतेचा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. २७ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असं अवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अधिकारी सुष्मा नायर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि मुंबईतील काही ठिकाणी चक्रीवादळा सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळं तापमानात वाढ होणार आहे. २७ आणि २८ एप्रिल रोजी तापमानात कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उष्णतेच्या झळा वाढत असल्याने भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ३ यावेळेत घराबाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा, भडक रंगाचे कपडे वापरू नका त्याऐवजी कॉटनचे ड्रेस वापरा. घराबाहेर निघताना टोपी किंवा स्कार्फ बांधा, असे आवाहन करण्यात आले आहे.