तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने महावितरण विभागाला ५० लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१ ट्रान्स्फॉर्मर जळाले; तर १४५ वीज खांब पडले असून, वीज वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जूनपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलैमध्ये तर अतिवृष्टीने सर्वच स्तरांवर मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात रस्त्यांवर झाडे उन्मळून पडणे, दरड, मातीचा भराव कोसळणे, घरांची पडझड असे कितीतरी आपत्तीत नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत तालुक्याचे सुमारे १ कोटीचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला होता.
तालुक्यात १२२ गावांमध्ये शृंगारतळी सबस्टेशन विभाग वगळता आबलोली, रानवी, तळवली, हेदवी, वेळणेश्वर या सबस्टेशन अंतर्गत येणारी बहुतांश गावे गेली ३ दिवस अंधारात आहेत. या महिन्यात २१ ट्रान्स्फॉर्मर जळाले असून, त्यांचे ३५ लाखांचे तर १४५ वीज खांबांचे ८ लाख ४० हजार एवढे नुकसान झाले आहे. वीज वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष करून जुन्या, जीर्ण वीज खांबांचीच जास्त प्रमाणात पडझड झाली आहे. महावितरणने आलेल्या आपत्तीला सामोरे जात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
दरम्यान, शृंगारतळी सबस्टेशनच्या अखत्यारित येणाऱ्या गावांमध्ये उन्हाळ्यामध्येच देखभाल दुरुस्तीवर येथील सहायक अभियंता मंदार शिंदे यांनी भर दिल्याने यावर्षी अतिवृष्टीत महावितरणचे नुकसान टळले. ज्या विभागात महावितरणचे नुकसान झाले आहे तिथे ट्रान्स्फॉर्मर बदलणे, वीज खांब उभे करणे ही कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत.