वाळूच्या नवीन धोरणामध्ये अद्याप पारंपारिक हातपाटी व्यवसायाचा समावेश न केल्याने येथील दाभोळखाडी पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिक २६ जानेवारीपासून प्रांत कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना दिले आहे. महिनाभरापूर्वी केलेल्या उपोषणदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे पाऊल उचलल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, वाळूच्या नवीन धोरणामध्ये हातपाटी व्यवसायाचा समावेश न करून घेतल्यामुळे आम्ही पारंपारिक हातपाटी व्यावसायिकांनी १८ डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण केले होते.
त्यावेळी आपण स्वतः पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांच्याबरोबर दूरध्वनीव्दारे चर्चा केली होती. त्यावेळी हा प्रश्न ८ ते १० दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज याला महिन्याचा कालावधी होत आला असून हातपाटी व्यवसायास अद्याप परवानगी मिळालेली नाही, तसेच सदर प्रश्नी कोणत्याही प्रकारची बैठक देखील झालेली नाही. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक वर्षे हा पारंपरिक हातपाटी व्यावसाय करीत असल्यामुळे इतर अन्य उपजिविकेचे साधन या कुटुंबांकडे नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी काय करावे असा प्रश्न उभा राहिला आहे.
तरी शासनाच्या नवीन वाळू धोरणामध्ये हातपाटी व्यवसायास समाविष्ठ करून घेण्यास आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा हातपाटी व्यावसायिक २६ जानेवारीपासून लोकशाही पध्दतीने आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर हारून घारे, अन्वर जबले यांच्यासह हातपाटी वाळू व्यवसायिकांच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी सिंह, माजी आमदार रमेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आदींना देण्यात आल्या आहेत.