सागरी महामार्गावरून जनावरांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघा व्यक्तींना जेरबंद करण्यात नाटे पोलिसांना यश आले आहे. कशेळीते पूर्णगड दरम्यानच्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नाटे पोलिसांनी चेतन सुरेश यादव व रंजन शंकर खानविलकर (रा. राजापूर) या संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडील एकूण सुमारे ६ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे स्तरावर जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
या नाकाबंदी दरम्यान नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या कशेळी ते पूर्णगड या सागरी महामार्गावर बुधवार ९ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने नाटे पोलीस पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात येत होती. या दरम्यान सागरी महामार्गावरून एक संशयास्पद वाहन येताना दिसल्याने पोलीसांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता या वाहनामध्ये ५ जनावरे निर्दयतेने कोंबून भरलेली दिसून आली. या पथकामार्फत लागलीच पाचही प्राण्यांची सुटका करण्यात आली तसेच गुरांना घेवून जाणारे चेतन सुरेश यादव व रंजन शंकर खानविलकर या दोघांना महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याविरुद्ध नाटे पोलीस ठाणे येथे प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (च) व प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (ब) तसेच भा.द.वि.सं कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये संशयितांकडील सुमारे ६ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या पाचही जनावरांना नाटे पोलीसांमार्फत एका शेतकरी कुटुंबातील गुरांच्या गोठ्यामध्ये तात्पुरता चारा व निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्यासह कॉन्स्टेबल ठोके, जाधव, सागर कोरे, गुरव यांनी ही कारवाई केली. या गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.