तलाठी-मंडल अधिकाऱ्यांच्या पदभरतीसह अन्य विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या मार्गदर्शनाखाली तलाठी-मंडल अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तलाठी-मंडल अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यालयांच्या चाव्या त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघा शाखा तालुका राजापूरच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तलाठ्यांनी अतिरिक्त कार्यभार असलेल्या सजांच्या कार्यालयाच्या चाव्या महसूल प्रशासनाकडे जमा केल्या आहेत.
संघटनेने शासनाला निवेदन दिले आहे. हे निवेदन तालुका अध्यक्ष सुरेश डाकरे, विभागीय संघटक संदीप कोकरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी येथील महसूल प्रशासनाला दिले. तलाठ्यांसह मंडल अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांमुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक तलाठ्यांना सजांचा अतिरिक्त पदभार सांभाळावे लागते, त्यांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी व ई-हक्क प्रणालीद्वारे कामकाज सुरू आहे. या प्रणालीमध्ये काम करताना तलाठी- मंडल अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशा विविध समस्या संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी मांडण्यात आल्या; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.