सार्वजनिक सुट्टीचे दिवस आणि सणासुदीच्या दिवशी बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्याबद्दल एसटी प्रशासनाला वायंगणी ग्रामस्थ यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्या उपस्थितीत एसटी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून पूर्वी प्रमाणे बस सेवा दिली जाईल, असे बस स्थानक प्रमुख सौ. प्रभुणे यांनी सांगितले. या प्रसंगी उदय बने म्हणाले की फार पूर्वी पासून रत्नागिरी शहराला भाजीपाला पुरविणाऱ्या गावामधे वायंगणी, कसोप, गणेशगुळे यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.
चांगल्या प्रकारची ताजी भाजी ही गावे पुरवित आली आहेत. अनेक गरीब लोकांचा उदरनिर्वाह या भाजीपाला व्यवसायांवरती चालतो. वायंगणी गावातील बस फेऱ्या रद्द असल्याने याचा प्रमुख फटका भाजी व्यावसायिकांना बसत आहे. वायंगणी गावातून फाट्यापर्यंत दोन ते अडीच किलोमीटर अंतर असून वाहन उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांना भाजी डोक्यावरून फाट्यापर्यंत आणावी लागते आणि मिळेल त्या वाहनाची वाट पहात भाजीपाला रत्नागिरी शहरात आणला जातो. प्रसंगी काहीवेळा भाजी खराब होते. याचा फटका भाजी व्यावसायिकांना बसत आला आहे.