आयएनएस विक्रांत फंड घोटाळा प्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा पुत्र नील सोमय्या यांना देखील नोटीस पाठवली आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहिम राबवली होती. सोमय्या यांनी त्यावेळी लोकांकडून पैसे गोळा केले होते. हे पैसे राजभवनात जमा करणार असल्याचं देखील तेव्हा सांगितलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पैसे राजभवनात जमा केले नाहीत, असं राजभवनाने सांगितल्याचं राऊत म्हणाले. याबाबत त्यांनी काही कागदपत्रे दाखवली. यामध्ये राऊत यांनी ५७ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
किरीट सोमय्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात जाणार नाहीत. किरीट आणि निल सोमय्या आपल्या वकिलांच्या मार्फत पोलिसांच्या समन्सला उत्तर देणार आहेत. आज त्यांना उपस्थित राहण्याचे सांगितले होते. परंतु ते दोघेही नॉट रिचेबल झालेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या सर्व प्रकरणावर मत प्रदर्शित केले आहे, कोट्यवधीचा हा निधी त्यांनी परस्पर हडप करुन आयएनएस विक्रांतसंदर्भात देशभावनेचा बाजारात लिलाव केला. महाराष्ट्र सर्व खपवून घेईल पण देशविरोधात कार्य कदापि खपवून घेतलं जाणार नाही. राज्यात यावर आंदोलन छेडण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सोमय्यांविरोधात कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरं द्यायची वेळ आल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी गेलेत, अशी टीका केली आहे. पोलिसांचा समन्स आल्यावर, सोमय्या बापबेटे आता गायब झालेत, असे राऊत म्हणाले.