कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन आरवली दरम्यान अचानक बिघडल्याने ती खोळंबली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी २ तास मेहनत घेत इंजिन दुरुस्त केल्यानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. जनशताब्दी एक्सप्रेस २ तास खोळंबली असली तरी सुदैवाने अन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला नाही. याविषयी अधिक वृत्त असे की, मुंबईतील सीएसटी-मडगाव दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन शुक्रवारी सकाळी ११ वाजण्यांच्या सुमारास आरवली रोड स्थानकानजीक नादुरुस्त झाले.
यामुळे मडगावकडे जाणारी ही सुपरफास्ट गाडी पर्यायी इंजिन उपलब्ध होईपर्यंत आरवली येथे जवळपास दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती. इंजिनमध्ये दुरुस्ती केल्यावर १२.५३ मिनिटांनी गाडी मार्गस्थ झाली. मुंबईहून गोव्यात मडगावला जाण्यासाठी निघालेली ही सुपरफास्ट गाडी आरवलीनजीक आली असता गाडीचे इंजिन बिघडले. चिपळूण येथून ही गाडी १०.०२ मिनिटांनी तिच्या पुढील निर्धारित थांबा असलेल्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना होते. मात्र शुक्रवारी ही गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सावर्डे स्थानकापर्यंत ४० मिनिटे विलंबाने धावत होती.
पुढे आरवली नजीक तिचे इंजिन खराब झाल्याने दुपारी १२.३० वाजेपर्यंत ती आरवली येथे उभी होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्यायी इंजिन जोडून ही गाडी पुढील प्रवासासाठी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर प्रयत्न केले. दुरुस्तीनंतर दुपारी १२.५३ मिनिटांनी गाडी मार्गस्थ झाली असे कोकण रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले.