मुंबई-गोवा महामार्गावरील करोडो रुपये खर्च करून उभारलेला कशेडी बोगदा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. बोगद्यात वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो सातत्याने खंडित होत असल्याने भुयारी मार्गात वाहन चालवणे कठीण बनले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. एप्रिल-मे महिन्यांत दोन्ही बोगद्यात वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधान होते; मात्र, सध्या ही सुविधा अपूर्ण आणि अपयशी ठरत आहे. बोगद्यातील दिवे वारंवार बंद पडत असल्याने अंधारात वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक गोंधळून जात असून, दुर्घटना टाळणे मोठे आव्हान बनले आहे. कशेडी बोगद्यात पाण्याची गळतीही मोठी समस्या आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ती तात्पुरती थांबवून दिलासा दिला होता; मात्र, गळती पुन्हा सुरू झाली आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी नव्या समस्या उद्भवत असून, आता खंडित वीजपुरवठ्यामुळे वाहनचालकांच्या समस्या अधिकच गंभीर बनल्या आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांतून होत आहे.