मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या डरकाळ्या फोडणारे वाघ गेले कुठे? त्यांना आता शोधण्याची वेळ आली आहे. असंतुष्ट महाविकास आघाडीला अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार सापडलेला नाही, त्यांचे भवितव्य या निवडणुकीत काय आणि त्यांना दुसऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार काय ? अशी टोलेबाजी करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उबाठा शिवसेना आणि महाविकास आघाडीला चिमटे काढले. विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा आजही आम्ही सोडलेला नाही. मात्र, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.
घाबरून उमेदवारी मागे घेतली, अशा आवया उठविण्यात आल्या. मात्र, मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही. आमचा विषय सोडविण्यात आम्ही सक्षम आहोत. दुसऱ्यांनी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे एका महिलेला उमेदवारी दिली आहे. त्या महिलेचे आम्ही कौतुक करतो. मात्र, आमच्यासमोर जे उमेदवार देताय ते उमेदवार निदान सक्षम आणि तुल्यबळ तरी द्या, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. वैयक्तिक टीकेवर कोणी येऊ नये. घरापर्यंत याल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत.