कोकणात जाणाऱ्या महामार्गावरील कशेडी बोगदा ऑगस्ट अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन गळतीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते; मात्र, आता कशेडी घाटातील या बोगद्यामुळे प्रवास थोडा सुखकर होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात ये-जा करण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत. कोकणातून मुंबईकडे जाणारा बोगदा सध्या दुहेरी वाहतुकीसाठी वापरला जात आहे; मात्र कोकणात जाणाऱ्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही कामे शिल्लक आहेत. ती पूर्ण करून बोगदा ऑगस्ट महिन्यात सुरू केला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कशेडी घाटातील बोगद्याला गळती लागल्याची चर्चा होती. ही गळती थांबवण्यासाठी महामार्ग विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते.
त्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांची मदत घेतली जात होती. त्यांच्या माध्यमातून पाहणी करून गळतीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. सध्या ग्राउटिंग करून गळती थांबवण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे.