इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या पालिकेने हटवून संबंधित विक्रेत्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. ही जागा नव्याने झालेल्या बायपास मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला येथे अत्यंत कमी संख्येने खाद्यपदार्थ विक्रेते होते; मात्र आता वर्षभराच्या कालावधीत ही संख्या सुमारे ५०हून अधिक झाली आहे. परिणामी, काही विक्रेत्यांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. दिलेल्या जागेपेक्षा ज्यादा जागेचा वापर तसेच रस्त्याच्या बाजूला आखून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर विक्रेत्यांनी शेड उभी करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यात अतिक्रमणाचा गैरफायदा घेण्यासाठी काहींनी डांबरी रस्त्यावर खड्डे खोदून पक्के स्टीलचे बार लावून शेड उभ्या केल्या.
अनेक व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेलाच ग्राहकांसाठी खुर्य्या मांडून वाहतूक धोकादायक व अडथळा होईल, अशा पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवले आहेत. काहीवेळा या ठिकाणी छोटे अपघात देखील झाले आहेत. या सर्व गोष्टींच्या तक्रारी पालिकेकडे झाल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स पट्ट्याच्या मागे नेण्यात आले. रस्ता खोदून शेड उभी केली त्या गोवळकोट येथील शोएब मुकादम याच्यावर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
कारवाईत यांनी घेतला सहभाग… – या कारवाईत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक महेश जाधव, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, बापू साडविलकर, अमोल वीर, संदेश टोपरे, सचिन शिंदे आदी सहभागी झाले होते.