कोकणातील सागरी महामार्गावरील काळबादेवी आणि जयगड येथील केबल स्टेड पुलाच्या कामांना गती मिळाली आहे. याचबरोबर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील खाडीवर मंजूर झाला असून, ९०० मीटरचा हा पूल सुमारे ३०० कोटीचा आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे एमएसआरडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील आठ पुलांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्याचबरोबर महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. परिणामी, सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहेत.
पुलांचा ठेका घेणाऱ्या कंपन्यांना पुलांचे काम पूर्ण करण्याची मुदतही तीन वर्षांची देण्यात आली आहे. या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होऊ शकेल. या मार्गावर पाच मोठे सागरी पूल बांधावे लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झाले आहे. दुसरा पूल आहे आगरदांडा-दिवेआगर, तर तिसरा पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथा पूल आहे. दाभोळ-जयगड, पाचवा पूल काळबादेवीत होणार आहे. या पुलांना ग्रीनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजुरी देण्यात आली आहे.
तीन पुलांसाठी १४०० कोटी – एमएसआरडीमार्फत पुलांचे काम होणार आहे. काळबादेवी आणि जयगड पुलांचा सर्व्हे आणि डिझाईन प्रक्रिया सुरू आहे. काळबादेवी पूल सुमारे ३०० कोटीचा असून, त्याची लांबी ३२०० मीटर आहे. जयगडचा पूल सव्वाचार कि.मी.चा असून, त्याचा खर्च ९०० कोटीएवढा आहे. तिसऱ्या दाभोळ खाडीपुलालाही मंजुरी मिळाली आहे. तो ३०० कोटीचा असून, त्याची लांबी ९०० मीटर आहे. तिन्ही पुलांसाठी सुमारे १४०० कोटीचा निधी येणार आहे.