रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील १-२ महिन्यापासून मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यावर जिल्हा पोलीस अधिक्षक गर्ग यांनी सध्या तरी जिल्ह्यात अशी कोणतीही टोळी सक्रीय नसल्याची माहिती दिली होती. परंतु, काल खेड तालुक्यातील गुणदे भागामध्ये झोपडीतून एका लहान मुलाला पळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, स्थानिकांनी त्याला पकडले आणि चांगला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
छोटूलाल अमरनाथ भारती मूळ रा. बनारस, उत्तरप्रदेश, सध्या रा. आवाशी असे पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. खेड येथील अन्य एक संशयित कृष्णा नामक इसमालाही या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंगाराव शिवराम चव्हाण हे आवाशी-गुणदे येथे मागील गेल्या ४० वर्षांपासून लोहारकाम करतात. या ठिकाणी ते झोपडी बांधून कुटुंबासह राहतात.
शुक्रवारी दि. १४ रोजी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास ते झोपले असता एक अनोळखी इसम येऊन त्यांच्या झोपडी बाहेरील दिवे विझवून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. या वेळी त्यांच्या बहिणीला कुणीतरी झोपडीत शिरल्याची चाहूल लागली. त्यांनी आरडाओरडा करताच रंगाराव जागे झाले. क्षणात त्यांनी त्या अनोळखी इसमाला पकडले. आवाजाने शेजारील झोपडीत पत्नी व दोन वर्षांच्या मुलासह झोपलेला त्यांचा मुलगा सचिन तेथे आला. त्याने संशयित इसमाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्याला एका इसमाने ५० हजार देण्याच्या बदल्यात मूल चोरण्यासाठी पाठवले, मूल नेऊन दिल्यावर २० हजार व ते विकून झाल्यावर ३० हजार तो मला देणार असेही त्याने काबुल केल्याचे सांगितले.
घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी अनोळखी इसम हे सांगत असतानाचे छायाचित्रण केले. ही माहिती शनिवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी पहाटे चव्हाण कुटुंबाने आवाशी सरपंच व उपसरपंच यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली व पोलिसांना माहिती दिली. ही घटना व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या अपहरणकर्त्याच्या विरोधात याआधीही अपहरणाचा प्रयत्न, चोरीच्या इराद्याने घरात घुसणे आदीबद्दल गुन्हे दाखल आहेत. यातील मुख्य सूत्रधाराचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती लोटे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी यू. एस. भोसले यांनी दिली.