मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम लवकरात ;लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. तरी देखील या कामाला वेग प्राप्त झालेला नाही. महामार्गाची कामे हि संथ गतीनेच सुरु आहेत. इतका कालावधी गेला तरी ठेकेदार जबाबदारीने काम लवकर पूर्ण करण्याचे काहीच चिन्ह दिसून येत नाही आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ आणि लहान मोठ्या व्यापार्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होताना दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंत चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी परशुराम, लवेल व भरणे येथे चौपदरीकरणाचे काम अजूनही रडतखडत सुरू आहे. भरणे जगबुडी पुलानजीक चौपदरीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले. सपाटीकरणाचे कामही सुरू असून या कामामुळे चिपळूणच्या दिशेने जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलानजीक जोड पुलाचे कामदेखील सुरू आहे; मात्र या जोडपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नेमके कधी मार्गी लागेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सद्यःस्थितीत सपाटीकरणाच्या कामाने वेग घेतला असून या ठिकाणचे चौपदरीकरण लवकरच पूर्ण होईल, अशी आशा नागरिकांना आहे; मात्र नव्या जगबुडी पुलानजीक कोट्यवधी रुपये खर्चून जोडपुलाचे काम हाती घेण्यात आले. ते गेली ६-७ वर्ष संथगतीने सुरू आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र त्याला गती नसल्याने जोडपुलाचे काम नेमके कधी पूर्ण होईल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.