रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला खेड पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तब्बल २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. खेड पोलीस ठाण्याची ही सलग तिसरी मोठी कारवाई असून, या कारवाईमुळे जिल्ह्याच्या अमली पदार्थ विरोधी अभियानाला बळकटी मिळाली आहे. हे दोन्ही आरोपी एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना विशेष सूचना दिल्या आहेत. याच सूचनांच्या अनुषंगाने खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार सातत्याने कार्यरत आहेत.
३१ मे २०२५ रोजी दाखल झालेल्या एका एन.डी.पी. एस. कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपीने गांजा या अमत पदार्थाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८सी, २०बी, व २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ जून रोजी खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना जिल्हा/विभागीय गस्तीदरम्यान पहिली गोपनीय माहिती मिळाली. मुंबईहून एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून एक व्यक्ती मुंबई-गोवा महामार्गावरील शहरांमध्ये गांजा विक्रीसाठी येणार असल्याची ही माहिती होती. त्यानुसार, श्री. भोयर व त्यांच्या पथकाने भरणे नाका, खेड येथे गस्त सुरू केली. यावेळी त्यांना कमलेश उर्फ सुजल उर्फ रणजीत विचारे (२०, रा. नालासोपारा, वसई, पालघर, सध्या रा. शिवत दत्तवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा संशयित आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून १ कि ४४ ग्रॅम वजनाचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली यामाहा स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ सी, २०बी, २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना दुसरी महत्त्वाची माहिती मिळाली. तुतारी एक्सप्रेसमधून एक २०-२५ वयोगटाची व्यक्ती हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची ही माहिती होती. या माहितीच्या आधारे नितीन भोयर व त्यांच्या पथकाने खेड रेल्वे स्थानकावर पाळत ठेवली. त्यावेळी त्यांना रर्व प्रेमचंद खैरालिया (२५, रा. उत्तर प्रदेश राज्य, सध्या रा. रूम नंबर १०१, मुस्कान अपार्टमेंट, टाकी रोड, गावदेवी मंदिर, आंबेडकर नगर, मिठा दौड, ठाणे जिल्हा) हा व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळला. त्याच्या ताब्यातून खेड पोलीस ठाण पथकाला १ किलो २२ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८सी, २०बी, २८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात पोलीस कोठडी मिळवण्यासाठी हजर करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासानुसार हे दोन्ही आरोपी एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. खेड पोलीस ठाण्यामार्फत या ड्रग कार्टलच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही महत्त्वपूर्ण कामगिरी रत्नागिरी पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव, ओहोळ आणि स्थानिक गुन्हें शाखेचे विक्रम पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.