HomeRatnagiriखेडमध्ये एसटी वाहकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड; प्रशासनाची मोठी कारवाई, वाहक तत्काळ निलंबित!

खेडमध्ये एसटी वाहकाकडून विद्यार्थिनीची छेडछाड; प्रशासनाची मोठी कारवाई, वाहक तत्काळ निलंबित!

प्रवासादरम्यान त्रास देऊन पाठलाग करणाऱ्या एसटी वाहकावर पोलिसांत गुन्हा दाखल; खेड बस स्थानकात गोंधळ.

खेड (रत्नागिरी): प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या एसटी बसमधील कर्मचाऱ्याकडूनच एका महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड झाल्याची संतापजनक घटना खेड तालुक्यात समोर आली आहे. एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या आणि बसमधून उतरल्यानंतर तिचा पाठलाग करून मोबाईल नंबर मागणाऱ्या वाहकावर (कंडक्टर) एसटी प्रशासनाने कठोर कारवाई करत त्याला तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे. बी. डी. गोचडे असे या निलंबित वाहकाचे नाव असून, खेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे खेड आगाराच्या (डेपो) एसटी बसने आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करत होती. प्रवासादरम्यान गाडीतील वाहक बी. डी. गोचडे याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तो तिच्याकडे तिची वैयक्तिक माहिती विचारत तिची छेड काढू लागला.

वाहक सतत विचारणा करत असल्याने आणि त्याचा त्रास असह्य झाल्याने पीडित तरुणी आपल्या जागेवरून उठून बसमध्ये दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली. मात्र, या नराधमाची मजल एवढ्यावरच थांबली नाही. विद्यार्थिनी एसटी बसमधून खाली उतरल्यानंतरही या वाहकाने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे तिचा मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला.

प्राचार्यांकडे धाव आणि बस स्थानकात राजकीय नेते आक्रमक

प्रवासादरम्यान घडलेला हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पीडित तरुणीने न घाबरता थेट आपल्या कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य ओळखून ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते संजय कदम यांनी तत्काळ खेड बस स्थानकात धाव घेतली. त्यावेळी स्थानक प्रमुख उपस्थित नव्हते आणि आगारप्रमुखांना येण्यास विलंब होत असल्याचे पाहून संजय कदम यांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रवाशांच्या, विशेषतः महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

वाहक चिपळूणहून परत बोलावला; पोलिसांकडून तातडीने अटक

या घटनेची गंभीर दखल घेत खेड आगारप्रमुखांनी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या अहवालाच्या आधारे विभागीय वाहतूक नियंत्रकांनी कोणतीही दिरंगाई न करता संशयित वाहक बी. डी. गोचडे याला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी केले.

घटना घडल्यानंतर संशयित वाहक आपली सेवा बजावण्यासाठी चिपळूण येथे निघून गेला होता. मात्र, एसटी प्रशासनाने त्याला तातडीने खेड बस स्थानकात परत बोलावून घेतले. वाहक खेडमध्ये दाखल होताच पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वाहकावर गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून पूर्ण केली जात होती.

RELATED ARTICLES

Most Popular