आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे सध्या अडचणीत असलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. किरीट सोमय्यांना यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताना तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यावेळी कोर्टाने किरीट सोमय्यांना चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावं लागणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
आयएनएस विक्रांत फंड गोळा प्रकरणी अटकेच्या भीतीने गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या कोर्टाने दिलासा दिल्यावर अखेर मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ८ एप्रिलनंतर सोमय्या हे प्रथमच सर्वांसमोर हजर झाले आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ”मी होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो.” पुढचा नंबर कोणाचा लागणार हे लवकरच सांगणार.
मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. त्यांनी अटकेपासून संरक्षण दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, न्यायालय आज जे प्रश्न उपस्थित करत आहे, तेच प्रश्न मी गेल्या आठ दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणा करत आहे. सीएमओचं काम फक्त पोलिसांना माफियागिरी करायला लावायची. खोट्या एफआयआर फाईल करायच्या. अटक करून तुरुंगात टाकायचं, हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे, असं ते म्हणाले आहेत.
आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची भीती असल्याने किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. जामीन मिळताच सोमय्या पुन्हा एकदा अवतीर्ण झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या जामिनावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.