दापोली तालुक्यातील मुरुड येथील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसोर्ट तोडण्यासाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. १०० गाड्यांचा ताफा घेऊन मुरुड येथील अनिल परब यांचे साई रिसोर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे रिसोर्ट अद्याप पाडण्यात न आल्याने २६ मार्च रोजी किरीट सोमय्या चक्क प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले होते. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जाणवत असलेली तेढ लक्षात घेता, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून थांबविल्याने त्यांना रिसोर्टपर्यंत पोहोचता आले नाही. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत किरीट सोमय्या ठाण मांडून बसले होते, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जिल्ह्याबाहेर नेत मुंबईच्या दिशेने पाठविण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी ‘बेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
त्यानंतर लगेच किरीट सोमय्या यांनी रविवारी आणखी एक ट्विट करुन शिवसेनेच्या माजी आमदारावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूर्यकांत दळवी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दापोलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे. त्याचा सातबाराही त्यांनी जोडला आहे.