वर्षाचा शेवट, नवीन वर्षाचे आगमन आणि ख्रिसमसमुळे कोकणामध्ये अधिक प्रमाणात गर्दी होऊ लागणार आहे. याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे कायमच तत्पर असते. वाढत्या पर्यटकांची संख्या पाहून रोजच्या काही गाड्यांना जादाचे डबे जोडण्याचा विचार रेल्वे विभागाने केला आहे. जेणेकरून पर्यटकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागणार नाही.
पर्यटक हंगाम सुरु झाला असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. डिसेंबरमधील ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक गोव्याला पसंती देतात. अनेक जण नवीन वर्षाची बुकिंग अनेक महिने आधीपासूनच करून ठेवतात. त्यामुळे आयत्या वेळी उद्भवणारा तिकिटाचा प्रश्न आणि समस्या यांना तोंड द्यावे लागत नाही. या कालावधीत कोकणात आणि तळकोकणात दाखल होणाऱ्या पर्यटकांसाठी कोकण रेल्वेने चार गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये गांधीधाम -तिरुनेलवेली, भावनगर-कोचुवली, जामनगर ते तिरुनेलवेली, तसेच हाप्पा-मडगाव एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला २८ नोव्हेंबरपासून २९ डिसेंबरपर्यंत, भावनगर-कोचुवेली एक्स्प्रेसला २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत, जामनगर-तिरुनलवेली एक्स्प्रेसला २ ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी तर हाप्पा-मडगावला ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढविण्यात आला आहे.
पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वे विभागाने या गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होईल.