हवामान विभागाने अधिकृत पत्रक जारी केले व मान्सूनचे तीन ते चार दिवस आधी आगमन होणार असल्याची खूशखबर दिली. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही गुरुवारी ट्विट करीत अंदमानच्या समुद्रात मान्सून पुढच्या आठवडय़ात दाखल होणार असल्याचे जाहीर केले.
दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळे आधी मान्सून हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मे पर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. सध्या असनी चक्रीवादळाचा वेग निवळत असला तरी, याच्या अवशेषांमुळे आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे शुक्रवारी आंध्र प्रदेश व परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मागील महिन्यात १४ एप्रिल रोजी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात देशभरात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्या वर्षी नैॡत्य मोसमी वारे २१ मे दरम्यान अंदमानात तर, ३ जून दरम्यान केरळमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मॉन्सून ५ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला. मात्र, यंदा मान्सून येत्या रविवारपर्यंत अंदमान समुद्रात दाखल होऊ शकतो. अद्याप हवामानशास्त्र विभागाद्वारे मान्सून हंगामाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही. हा अंदाज जाहीर झाल्यास मान्सूनच्या आगमनाच्या तारखा स्पष्ट होतील.