कोकणचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जागतिक पातळीवर देखील जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, विजय राणे, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदी मंडळी एकत्र येत सिंधुरत्न कलावंत मंच या संस्था स्थापली. या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीमध्ये पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहोचविण्या सोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.
लेखक-दिग्दर्शक विजय राणे यांनी काही माहिती दिली. ते म्हणाले, या महोत्सवात चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलावंतांचा सन्मान देखील केला जाणार आहे. या निमित्ताने या दिग्गजांचे आशीर्वादरूपी पाठबळ या महोत्सवाला लाभतील आणि आमच्यासाठी ते प्रेरणादायी असतील. हा महोत्सव कलासृष्टीला वेगळ वळण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
रत्नागिरी येथील वीर सावरकर नाट्यगृह येथे या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होईल. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग ४ दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविण्यात येणार आहेत. या चार दिवसांत अंदाजे २५ ते ३० हजार प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
कोकण चित्रपट महोत्सवाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शुभारंभ दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या ८ तालुक्यात ४ दिवस दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आलेले १४ चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जाणार आहेत. दिनांक १२ मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवाद देखील आयोजित करण्यात आले आहेत.