या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व श्री क्षेत्र परशुराम यामध्ये “अध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” अशा नावाचा आश्रम असल्याचे सांगण्यात येते.
अनेक महिन्यांपासून सुरु ! – या आश्रमातूनच मागील अनेक महिन्यांपासून असे प्रकार घडत असल्याची चर्चा जनतेतून मागील काही काळापासून सुरु आहे. या महाराजाचा हा आश्रम लोटेएम. आय. डी. सी. च्या जागेत बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात येते. तेथे हे महाराज एक गोशाळा देखील चालवितात. सध्याच्या काळात गोशाळा चालविणे हा एक मोठा धनप्राप्तीचा व्यवसाय झाला आहे. अनेक उपटसुंभ स्वतःला ‘गो सेवक’ म्हणवून घेत असतात.
कोकरे महाराजाला अटक – या भगवान कोकरे नामक महाराजांवर काल सोम. दि. १३ ऑक्टो. रोजी रात्रौ २ वा. खेड पोलीस स्थानकात रितसर गुन्हा नोंद करण्यात आला. एका १७वर्षीय मुलीने अगदी नाईलाज झाला तेव्हा पोलीस स्थानकात जाऊन ही तक्रार दाखल केली. आपल्यावर अत्याचार झाल्याची तसेच लैंगिक शोषण झाल्याची तक्रार त्या मुलीने थेट खेड पोलीस स्थानकात जाऊन केली. पोलिसांनी तिची तक्रार तत्परतेने नोंद केली आणि तितक्याच तत्परतेने त्यांनी ‘त्या’ महाराजांचे विरुद्ध कारवाई करुन त्यांना अटक केली व कोर्टासमोर उभे केले.
भलतेच शिक्षणाचे प्रयोग ! – आश्रमात मुलींना व मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत असे. परंतु प्रत्यक्षात त्यांच्यावर भलतेच व नको नको ते प्रयोग करण्यात आले. त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार करण्यात आले, आजारपणाचा कसा गैरफायदा घेण्यात आला, उघडपणे शारीरिक गोष्टींची मागणी करण्यात आली आणि वाच्यता केल्यास कठोर परिणामांची धमकी देण्यात आली ते सर्व यावेळी पुढे आले असे खेड पोलीस स्थानकाच्या तपासी अंमलदारांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
२ ह.भ.प. असिस्टंट ! – म्हणे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यासाठी ह. भ.प. प्रितेश कदम केळणे) व ह. भ. प. संकेत उतेकर (साखर) या दोघांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या महाराजांना वाचविण्यासाठी या दोघांनी खूप खूप प्रयत्न केले अशी चर्चा आता परिसरात खुलेआम सुरु झाली आहे. हे सर्व प्रकार मागील जूनपासून बिनधास्त सुरु होते असेही सांगण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील काही सुजाण मंडळींनी, सुसंस्कृत किर्तनकारांनी तसेच सुसंस्कारीत वारकरी व स्थानिक जनतेने याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या असून त्या मुलीला त्वरेने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
बिचारी मुलगी सोसत होती! – तक्रार करणाऱ्या पिडीत मुलीवर अशा प्रकारे वारंवार प्रयोग होऊ लागल्यानंतर ‘जर कोणाला काही सांगितलेस तर कुटुंबात व समाजात तुझी बदनामी होईल’ असे तिला सांगण्यात आल्याचे त्या मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. पिडीत मुलगी नाईलाजाने सर्व सोसत होती. परंतु असे प्रकार वारंवार घडू लागल्यावर काही काळाने तिच्या कुटुंबियांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्वरेने पोलीस स्थानकात धाव घेऊन महाराजांबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता सडेतोडपणे तक्रार दाखल केली.
महाराजावर ‘पोस्को’ गुन्हा ! – खेड पोलीस स्थानकात या प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पोस्को अंतर्गत कलम १२ व १७ अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (३), ८५ अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. शशांक सणस व खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक आहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित पहाणी केली.
महाराज पोलीस कोठडीत ! – खेड़ पोलिसांनी तत्पर कारवाई करुन या प्रकरणातील संशयित आरोपी भगवान कोकरे महाराज व त्यांचा साथीदार प्रितेश कदम यांना ताब्यात घेऊन लगोलग खेड न्यायालयासमोर उभे केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता भगवान कोकरे महाराज व त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम हे खेड पोलिसांच्या पोलीस कोठडीचा पाहुणचार घेत आहेत.
पिडीत मुलगी कोकरे महाराजाच्या आश्रमात – खेड पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पिडीत मुलगी मागील काही काळापासून भगवान कोकरे यांच्या गुरुकुलात अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी रहात होती. या दरम्यान त्या गुरुकुलाचा प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराजानी मुलीसोबत अनेकदा अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला असे तक्रारीत नमूद आहे. भगवान कोकरे हे त्या परिसरात गोशाळा देखील चालवत असल्याचे खेड पोलीस स्थानकातून सांगण्यात आले.
म्हणे, कोकरे महाराजांचा वशीला फारच दांडगा ! – पिडीत मुलीने सुरुवातीला त्या आश्रमातील एका सदस्याला ही घटना सांगितली असता त्याने सांगितले की, याबाबत कुठे काही बोलू नकोस. महाराजांची राजकीय ओळख फार मोठी आहे असे सांगून तिला गप्प रहाण्यास धमकावले. जर तू वाच्यता केलीस तर त्यामुळे तुझी आणि तुझ्या कुटुंबाची समाजात बदनामी होईल असे धमकावण्यात आले असल्याचे पिडीतीने तक्रारीत नमूद केल्याचे खेड पोलीस स्थानकातील तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
परशुराम भूमीला कीड जनतेतून तीव्र संताप – कोकरे महाराजाच्या आश्रम ातील हे प्रकरण आज थेट पोलीस स्थानकात दाखल होताच साऱ्या जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसानी व सरकारने कठोर कारवाई करुन त्यांचा बंदोबस्त करावा व समाजाला लागू पाहणारी ही कीड कठोरपणे ठेचून काढावी अशी संतप्त प्रतिक्रिया साऱ्या जिल्ह्यात जनतेतून खुलेआम व्यक्त करण्यात येत आहे. परशुराम भूमीत असे प्रकार घडावेत याबद्दल अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोकरे महाराजाचा हा आश्रम लोटे व श्री क्षेत्र परशुराम यामध्ये असल्याचे चर्चिले जाते.