32.7 C
Ratnagiri
Friday, March 14, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeKhedकोकण रेल्वे २५ तासांनी रुळावर, दिवाणखवटीतील दरड हटवली

कोकण रेल्वे २५ तासांनी रुळावर, दिवाणखवटीतील दरड हटवली

दोन जेसीबीच्या साहाय्याने चिखलमिश्रित भराव बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले होते.

खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथे नातूनगर टनेलसमोर रुळावर दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वे वाहतूक २५ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी संध्याकाळी सुरू झाली. रविवारी (ता. १४) जुलैला सायंकाळी ६ च्या सुमारास दरड खाली आली होती. सोमवारी सायंकाळी ४.३० ला रूळ सुरळीत झाल्याचे सर्टिफिकेट रेल्वेच्या तांत्रिक टीमकडून देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांडवी एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना झाली. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटीनजीक रेल्वेरुळावर मातीचा भराव आल्याने कोकण रेल्वेमार्ग २४ तासांहून अधिक काळ ठप्प होता. सोमवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरील दरड व चिखल बाजूला करण्याचे काम पूर्ण झाले.

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दिवाणखवटीत (नातूनगर टनेल) मातीचा भराव खाली आल्याने अनेक स्थानकांवर गाड्या थांबून ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मातीचा भराव काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले; मात्र त्यासोबत आलेले दगडगोटे, झाडे यांचा समावेश असल्याने काम कठीण होते. भराव तीन से चार तासांमध्ये हटवला जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. २० तास उलटून देखील भराव हटवण्यात यश आले नव्हते. दिवाणखवटी हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्यामुळे काढण्यात येणारा भराव, चिखल तसेच मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातील सैल झालेली माती, पाणी व दगडगोटे पुन्हा-पुन्हा रेल्वेरुळावर येत राहिल्याने भराव वाढतच होता.

भराव हटवला न गेल्यामुळे रेल्वे वाहतूक सद्यःस्थितीत ठप्प होती. सोमवारी सायंकाळी माती काढण्यात यश आले. त्यानंतर रुळावर चिखल येऊ नये, यासाठी काळजी घेण्यात आली. रूळ सुरक्षित झाल्याचे तांत्रिक पथकाकडून कळवल्यामुळे सातच्या सुमारास मांडवी एक्स्प्रेस रवाना झाली. या ठिकाणाहून गाड्या धिम्या गतीने सोडण्यात येणार आहेत. वाहतूक सुरू झाली असली तरीही वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी पुढील दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

दोन जेसीबी, शेकडो हात – दोन जेसीबीच्या साहाय्याने चिखलमिश्रित भराव बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले होते. याकरिता अभियंता, तसेच शंभरहून अधिक कामगार घटनास्थळी काम करत आहेत. शेकडो हात चिखलमिश्रित भराव बाजूला करून राबत होते; मात्र वारंवार रुळावर येणारा भराव यामुळे रेल्वेट्रॅक सुरू होण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे रेल्वे प्रशासनाला देखील सांगणे कठीण जात होते. सोमवारी मातीचा भराव बाजूला केला.

RELATED ARTICLES

Most Popular