या वर्षी चाकरमान्यांना गणपती बाप्पा चांगलाच पावणार असे दिसते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फटण्यासाठी कोरे एक नवी योजना आणीत आहे. रोरो सेवेच्या धर्तीवर कोकण रेल्वेने या गणेश उत्सवाला ट्रकप्रमाणेच चाकरमान्यांची गाडी ट्रेनवरून नेण्याची योजना आखली आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची पत्रकार परिषद पार पडली त्यानंतर काही पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी गोड बातमी दिली. मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करणारी ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ (रो-रो) सेवा कोकण रेल्वे मार्गावर मागील २५ वर्षांपासून कम ालीची यशस्वी ठरत आहे. कोकण रेल्वेला रो-रो सेवेतून कोट्यवधी रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोना, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधाच्या काळातही कोकण रेल्वेची रो-रो सेवा सुसाट धावत होती.
मुंबईतून कोकणात जाताना अनेक अडचणींना चाकरमान्यांना तोंड द्यावं लागतं. त्यात मुंबई गोवा हायवे हा गेली कित्येक वर्ष रखडला आहे. त्यामुळे हायवेने गाडीने जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून गणेशोत्सव काळात चार तासात मालवणीत पोचणारी बोट सुरु करण्याची घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. आता याच धर्तीवर गणेशोत्सवाला प्रयोग म्हणून ही रस्त्यावरील वाहतूक टाळू इच्छिणाऱ्यांसाठी रेल्वे वॅगनवर कार आणि एसयूव्ही घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महामार्गवरील तासतास कोंडी टाळण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. ही योजना यशस्वी झाली तर पुढे ती कायम सुरु ठेवण्याचा कोरेचा विचार होऊ शकतो. या सेवेमुळे महामार्गावरील अपघात कमी होतील. वेळ आणि खर्चात बचत होईल. आणि प्रवास सुरक्षित होईल असे चाकरमान्यांचे म्हणणं आहे.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा म्हणाले, ही एक चांगली कल्पना आहे आणि आम्ही निश्चितपणे ती जाहीर करू. आम्ही बऱ्याच काळापासून ट्रक वाहून नेत आहोत. त्यांचे चालक तिकिटे खरेदी करतात आणि त्यांच्या वाहनांमध्ये प्रवास करतात. आम्ही खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी देण्याचा विचार करू शकतो, असंही ते म्हणाले, पण तसं अजून पक्क ठरविले नाही. सध्याच्या वॅगन विशेषतः ट्रकसाठी डिझाइन केलेल्या असल्याने आम्हाला काही तांत्रिक बाबींवर पुनर्विचार करावा लागेल. या गणपती उत्सवात आम्ही ते वापरून पाहण्याचा आमचा मानस आहे. रो-रो योजनेत खाजगी वाहन मालकांना त्यांच्या वाहनांमध्ये प्रवास करावा लागेल की नाही हे अजून विचार नाही, असेही झा यांनी म्हटले आहे. कोकण रेल्वेमार्गावर ‘रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) सेवेमुळे रॅम्प वापरून ट्रक थेट ट्रेन वॅगनवर लोड करता येतात. ड्रायव्हर आणि क्लीनर वैध तिकिटांसह प्रवास करतात, बहुतेकदा प्रवासादरम्यान चालक ट्रक केबिनमध्ये झोपतात.