कोकणवासियांनो सावधान ! तुमचा शत्रु ‘जमीनीच्या’ मार्गाने येतो आहे. वेळीच जागे व्हा असे आवाहन करतानाच एकदा माझ्या हाती सत्ता देवून बघा कोकण, गोवा, केरळपेक्षा अधिक श्रीमंत होईल, फक्त त्या करता तुम्हाला सरकार चालवणारी माणसे बदलावी लागतील. मी तुमची मते मागायला जरूर आलो आहे पण मला स्वतःसाठी खुर्ची नको आहे. अख्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी मतांची साद घालतोय असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत केले. गुहागर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी आणि दापोलीचे उमेदवार संतोष आबगूल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा येथे झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी ही साद घातली.
जमीनी वाचवा ! – कोकणवासियांना संबोधित करताना राज ठाकरेंनी सांगितले की, बाबानों तुमच्या जमीनी सांभाळा कारण तुमचा शत्रु या ‘जमिनींच्या मागनि येतोय’ नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने कित्त्येक एकर जमीनी हडप केल्या गेल्या. आता बारसूसाठी भूसंपादन होते आहे. या तुमच्या जमीनी आहेत. माम ली किमतीत तुमच्याकडून त्या खरेदी केल्या जातात आणि दामदुप्पट किंमत घेवून सरकारला दिल्या जातात. हे सगळं तुमच्या डोळ्यादेखत घडत आहे आणि तरीही तुम्हांला त्याचं काहीही वाईट वाटत नाही. तुमच्या पायाखालील जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. जगात जी युद्ध झाली ती जमीनीच्या मालकीसाठी झाली हे विसरू नका. ज्यांना तुम्ही निवडून दिलत तेच लोकं तुमच्या जमीनींचे सौदे करत आहेत. हा राज ठाकरे आज तुम्हाला सांगतोय मी तुमच्या जमीनीवर विकास घडवून दाखवतो, असे विधान त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
३ जिल्हे महाराष्ट्र पोसू शकतात – राज ठाकरे त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की, कोकणात कधीही आलं तरी हे कोकण भुरळ घालतं. ७५० किमी समुद्रकिनारा लाभलेलं हे कोकण, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. जे परमेश्वराने आपल्याला दिलंय त्याकडे आपलं लक्ष नाही. फक्त पर्यटनावर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. तुम्ही कल्पना केली नसेल इतकं सुंदर कोकण होऊ शकतं. तुम्हाला गाव सोडावं लागणार नाही, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सगळे इथेच मिळेल असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.
सारे इथेच मिळेल – केरळात जा, अख्खं राज्य पर्यटनावर सुरू आहे, तिथे कुठे रिफायनरी आली? पर्यटनावर गोवा राज्य सुरू आहे. इतकं सुंदर कोकण करता येईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ना तुम्हाला. घर सोडावे लागेल, ना गाव सोडावे लागेल, तालुका सोडावा लागेल, तुम्हाला जे काही असेल इथेच मिळेल. आतापर्यंत हे का झाले नाही कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना निवडून देत आलात. तुम्ही खासदार, आमदार निवडून देता, दिल्लीत खासदार कोणते प्रश्न मांडतात, कोकणच्या पर्यटनावर किती प्रश्न मांडले गेले. कोकणाचा कॅलिफोर्निया करू असं सगळेच पुढारी सांगत होते. पण त्याचे पुढे काय झाले. आपल्याकडे चांगली हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असे राज ठाकरे म्हणाले.
५ वर्ष तमाशा – राज्याचा विचार नाही. काय उद्योग आपल्याकडे आले पाहिजे याचा विचार नाही. फक्त राजकारणात गुंतले गेलेत. ५ वर्ष तुम्ही तमाशा बघताय, इथला पक्ष तिथे जातो, तिथला पक्ष इथे येतो, हे आमदार विकले जातात वैगेरे… वैगेरे… हे ५ वर्ष तुम्ही पाहताय आणि सगळे टोकदार प्रश्न मनसेला विचारले जातात. बाकीच्यांना प्रश्न विचारताना धार बोथट झाली आहे असं संतप्त भावना राज यांनी व्यक्त केली.
एकदा हाती सत्ता द्या! – कोकणातील रस्त्यांबाबत नितीन गडकरींना मी फोन केला. इतकी वर्ष रस्त्याचे काम होत नाही, वाहतूक कोंडी होते, खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतोय, तुम्ही महाराष्ट्रातले, आमचा रस्ता चांगला का होत नाही विचारले, तेव्हा ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, कंत्राटाम ध्ये टक्केवारी होते, त्याच्याकडे पैसे उरले नसतील. अनेक कारणे असतील पण रस्ता झाला नाही. आमचा कोकणी म ाणूस साधा, भोळा आहे, कुणाला काही प्रश्न विचारत नाही. तो शोषित आहे. न चिडणाऱ्या, संवेदना नसलेल्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. तुम्हाला यात सुख मानायचे असेल तर माना. प्रगती काय असते, विकास काय असतो हे. एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता देऊन बघा, केरळ, गोवा सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे जाऊ, इतकी ताकद् कोकणात आहे.
कोकणात पक्ष बदलावे ‘लागतील, माणसे बदलावी लागतील. त्याच त्याच लोकांना मत देऊन तुम च्या हाती काय लागणार नाही असं कळकळीचं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले. या सभेला मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, रायगडचे जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख मनिष पाथरे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, राजापूर संपर्क प्रमुख दत्ता दिवाळे, खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे, दापोली तालुकाध्यक्ष नितीनं साटले, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.