पावसामध्ये धोकादायक बनलेल्या शहरातील ७१ इमलेधारकांना पालिकेच्या नगररचनाकार विभागाने नोटीस बजावली आहे. अतिधोकादायक इमले पाडून सुरक्षित ठिकाणी जावे किंवा तत्काळ दुरुस्ती करावी, असे नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे; परंतु शहरात नवीन भाजीमार्केटची इमारत धोकादायक आहे, ती वगळता एकही इमारत अतिधोकादायक नसल्याचे या विभागाने सांगितले. रत्नागिरी पालिका आणि नगररचना विभागाने मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात काही धोकादायक इमारतींची माहिती पुढे आली. याबाबत नगररचना विभागाने पालिकेला अवगत करून धोकादायक इमारत मालकांना तत्काळ नोटिसा बजावल्या.
पावसाळ्यातील खबरदारी म्हणून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शहरातील या ७१ इमारत मालकांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार मालकांना अतिधोकादायक इमारत असल्यास ती रिकामी करावी, असे नोटिसीत म्हटले आहे तर ज्या इमारती धोकादायक आहेत; परंतु त्यांची दुरुस्ती अनिवार्य आहे, अशा इमारती दुरुस्त करण्यास सांगितले आहे. पालिकेच्या नवीन भाजी मार्केटची इमारत अतिधोकादायक बनली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे स्पष्ट झाले आहे. इमारतीच्या आतील, बाहेरील सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे.
या नोटिशीविरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात धाव नोटिशीला स्थगिती घेऊन देण्याची विनंती केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर सर्व गाळेधारकांना आपापले गाळे खाली करून पालिकेच्या ताब्यात देण्याची नोटीस दिली. गाळेधारकांच्या कराराची मुदत संपली नसल्याने त्या नोटिशी विरुद्ध काही वर्षांपूर्वी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात प्रलंबितप्रकरणी अंतिम युक्तिवाद होणे शिल्लक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनांतर्गत खबरदारी म्हणून गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावली आहे.
भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाली असून, ती पडण्याची भीती आहे. त्यामुळे गाळे रिकामे करून घ्यावेत. नोटीसनुसार कारवाई न झाल्यास कोणतीही दुर्घटना घडल्यास होणाऱ्या जीवित व वित्तहानीस संबंधित गाळेधारक जबाबदार असतील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसलाच स्थगिती मिळावी यासाठी गाळेधारक न्यायालयात गेले आहेत.