संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या प्रकाराविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. स्वातंत्र्यदिनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितेत खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समिती यांच्यासह हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी यानी पत्रकार परिषदेत दिली. संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने केला होता.
प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यानी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांची भेट घेऊन याची माहिती दिली होती. यावरून अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या व त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार झाल्याचा आरोप खा. विनायक राऊत यानी केला होता. जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाकडे याबाबतची तक्रार ‘खा. राऊत यानी केली होती. मात्र चौकशीचे आश्वासन देऊन राज्यशासनाने या बड्या उद्योजकाना पाठीशी घातल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी केला आहे.
अटी व शर्थीचे पालन न करता या कंपन्यांनी पूर्वनियोजीत दलाल नेमून शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून हडप केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केला आहे. कंपन्यांचे सोकावलेले बोके मलीदा खाण्यासाठी दिसेल त्याची फसवणूक करत सुटले आहेत. काही अधिकाऱ्याना पैशाचे आमिष दाखवून खोटी व दिशाभूल करणारी कागदपत्रे तयार करून मुकत्याराने जमीन मालकाच्या ठिकाणी बोगस जमीनमालक उभे करून खोट्या मुखत्यारपत्राद्वारे जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चाळके यानी केला आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असून जमिनी खरेदीचे व्यवहार वारसतपास, फेरफार नोंदी, सातबारा उतारे आदी गोष्टी जिल्हाधिकारी कार्यालायकडून कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा चौकशी न करता अवघ्या एका आठवड्यात या जमिनी वनविभागाकडे हस्तांतरीत केली गेली आहे.
ही बाब संशयास्पद असल्याचेही शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी म्हटले आहे. १५ ऑगस्ट रोजी शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असुन खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समिती कुंडी व निगुडवाडी येथील ग्रामस्थ यांच्यासोबत हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी यानी दिली.