कोकण रेल्वे मार्गावर धावणारी वेगवान अन् आलिशान मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे. महागडा प्रवास असूनही १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गावी येण्यासाठी चाकरमान्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला सर्वाधिक पसंती दिली आहे. गणेशोत्सव कालावधीतील आलिशान वंदे भारत एक्सप्रेसच्या ९ फेऱ्या ‘फुल्ल’ झाल्या आहेत. ३ ऑक्टोबरपर्यंतच्या फेऱ्यांचे प्रतीक्षा यादिवरील बुकिंग सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या काही फेऱ्यांचा अपवाद वगळता अन्य फेन्या हाऊसफुल्ल धावल्या असून मध्यरेल्वेच्या तिजोरीतही तितकीच भर पडत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनापूर्वीच गणेशोत्सवातील ४ दिवसांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घ्यावी लागली होती. याशिवाय १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसही दीड महिना आधीच फुल्ल झाली होती. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक जाहीर होणाऱ्या गणपती स्पेशलच्या फऱ्यांचे आरक्षण खुले होताच काही मि निटातच फेऱ्या हाऊसफुल्ल होत आहेत. काही मिनिटातच फुल्ल होणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांमुळे चाकरमान्यांपुढे मुंबई मडगाव वंदे भारतचा उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ८ डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची आसन क्षमता ५३० इतकी आहे.
प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसला मिळत असलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेत अतिरिक्त डब्बे वाढविण्याची मागणीही प्रवाशांकडून होत आहे. वंदे भारतच्या लोकप्रियतेमुळे डब्यांची संख्या ८ वरून १६ डब्यांची चालविण्याची मागणी माध्यरेल्वेने केली आहे. ती मिळाल्यास आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे. गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या सर्व फेऱ्या फुल्ल झाल्याने प्रवासी प्रतीक्षा यादीवरच आहेत. २३ सप्टेंबर रोजी गणपती-गौरी विसर्जन होणार आहे यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई- मडगाव व मडगाव-मुंबई अशा अप-डाऊन मिळून ३ ऑक्टोबरपर्यंतच्या ९ फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे.