राज्यव्यापी सुरु असलेल्या एसटीच्या बेमुदत संपामुळे कर्मचाऱ्यांप्रमाणे जनतेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे संसर्गाच्या भीतीमुळे घराबाहेर पडण्यास शासनाने बंदी घातली होती तर, नंतर एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागासह शहरातील जनता, जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दोन्ही सभागृहात संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे कि, आमचा संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात अनेक गैरसमज पसरविल्याने त्यांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. असे सांगतानाच ३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असं आवाहन केले आहे. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या, यंदा परीक्षा ऑफलाईन सूरू आहेत, पण संपामुळे सध्या मुलांच्या परिक्षेला जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारे विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. एसटी संपाबाबत सरकारने केलेल्या निवेदनावर विधान परिषद सदस्य जयंत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आता संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे, यावेळी जर कामावर रुजू झाला नाही तर मात्र हा अखेरचा पर्याय ठरणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.