26.4 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeMaharashtraमोदींची हॅट्रिक ! आज शाही शपथविधी सोहळा !

मोदींची हॅट्रिक ! आज शाही शपथविधी सोहळा !

शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी ७.१५ वा. होणार आहे.

देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर हा शाही शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी ७.१५ वा. होणार असून यानिमित्ताने राष्ट्रपती भवनावर खास नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात येणार आहे. भव्यदिव्य स्वरुपात हा शपथविधी सोहळा पार पडणार असून या सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्यांसह देशभरातील विविध क्षेत्रातील ८ हजार व्हीआयपींना निमंत्रित करण्यात आले आहे.

विविध धर्माचे ५० प्रतिष्ठीत धर्मगुरुंसह खेळाडू, देशात स्वच्छता अभियान यशस्वी करणारे स्वच्छता कर्मचारी, विविध पक्षांचे आमदार, खासदार, उद्योगपती यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आले आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्रीक साधणारे मोदी पहिलेच नेते ठरणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असतानाच हा शपथविधी होत असल्याने’ तो भव्यदिव्य स्वरुपात व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

राष्ट्रपती भवनावर रोषणाई – सायंकाळी सूर्य मावळण्याच्या सुमारास हा शपथविधी सुरु होणार असल्याने राष्ट्रपती भवनावर लेसरद्व ारे विशेष आकर्षक अशी रोषणाई करण्यात येणार आहे. मावळत्या सुर्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन उजळून निघणार असून हा नजारा पहाणे नेत्रसुखद ठरणार आहे. त्याच्या जोडीलाच फुलांची नेत्रदिपक अशी आरास पहायला मिळणार आहे.

पाहुण्यांना निमंत्रण – सुमारे ८ हजार जणांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यामध्ये आपल्या शेजारील आणि अन्य काही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानील विक्रम सिंघ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल, मालदीवचे राष्ट्राध्यक्षा मोहम्मद मुइज्जु यांच्यासह भारतातील विविध देशांच्या राजदुतांनाही निमंत्रीत करण्यात आले आहे. याशिवाय परदेशात काम करणारे भारतीय वकील, डॉक्टर, कलाकार आणि काही प्रभावशाली व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे.

श्रमिकांचा सन्मान – याचबरोबर भारतातील सफाई कर्मचाऱ्यांना विशेष निमंत्रीत करण्यात आले असून एका अर्थाने श्रमिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्यक्षात घडविणारे भारतीय अभियंते, अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साकारणारे कुशल कारागीर, आदिवासी समाजातील कलाकार मंडळी, मोदींच्या सरकारच्या अनेक योजनांचे लाभार्थीनाही पाचारण करण्यात आले आहे.

५० धर्मगुरु – या शपथविधी सोहळ्याला विविध धर्मातील ५० प्रतिष्ठीत धर्मगुरु, नेते, पद्मपुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मान्यवर, देशभरातील जवळपास १५०० आमदार, खासदार, विविध पक्षांचे प्रमुख नेते यांनाहीं निमंत्रीत करण्यात आले आहे. मोदींच्या ‘मन की बात’ या रेडियोवरील संभाषणांमध्ये देशभरातील विविध क्षेत्रात कर्तबगारी दाखविणाऱ्या अनेक अपरिचितांचा परिचय मोदींनी आपल्या भाषणातून साऱ्या देशाला करुन दिला. अशा कर्तबगार मंडळींनादेखील रविवारच्या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे.

कडेकोट सुरक्षा – दिल्लीत रविवारी शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लाइडर, मायक्रो एअरक्राफ्ट यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या वापरावंर १० जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शपथविधी सोहळा परिसरात वाहनांना बंदी आहे. सुरक्षादलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. रविवारी दिल्लीतील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे.

सोहळा घरबसल्या पाहता येणार – हा भव्यदिव्य सोहळा देशातील नागरिकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी सायंकाळी ६ वाजल्यापासून युट्युब, फेसबुक पेज, विविध वृत्तवाहिन्या यांच्यावर प्रक्षेपीत करण्यात येणार आहे. ऑनलाईन पाहणार असाल तर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत युट्युब पेजवर, नरेंद्र मोदी यांच्या युट्युबवर पाहता येईल.

RELATED ARTICLES

Most Popular