मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गळती लागलेल्या ठिकाणापैकी पाच जागांवरील गळती ग्राउटिंग करून बंद करण्यात यश आले आहे. उर्वरित काम आठ दिवसांत पूर्ण होईल, असे राष्ट्रीय बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. बोगद्यामधून अवजड वाहतूक बंद ठेवली आली असून, येथून जाणाऱ्या वाहनांच्या वेगाला आळा घालण्यासाठी बोगद्यात मध्यभागी रिकामी पिंपं उभी केली आहेत. गेल्या वर्षभरात कोकणातून मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटात बोगदा खोदण्यात आला.
गणेशोत्सवात भुयारी मार्गातून वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातून खेडकडे जाणाऱ्या मतदारांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुयारी मार्ग खुला करून देण्यात आला. प्रत्येक सणाला भुयारी मार्ग सुरू करून काही कालावधीनंतर बंद करण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली. भुयारातून जाणाऱ्या वाहनांवर गेल्या तीन वर्षांपासून अखंड जलाभिषेक होत असल्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांकडून भुयाराच्या वरील भागातील कातळात जलाशय असल्याचा अंदाज वर्तवला होता. भुयारी मार्गामध्ये वायुविजनची सुविधा नसल्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर भुयारात गुदमरण्याचा अनुभव येतो, असे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्यामुळे येथून वाहने हाकणे धोकादायक असल्याचे चालकांचे मत होते. भविष्यात धोका निर्माण होऊ नये यासाठी बांधकाम विभागाकडून ग्राउटिंगद्वारे बोगद्यातील गळती रोखण्याचे काम हाती घेतले होते. ते काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण आठ ठिकाणी गळती लागली होती. त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रांच्या साह्याने सिमेंट टाकून आतील पाणी अन्य मार्गाकडे वळवण्यात आले आहे. आतापर्यंत पाच ठिकाणची गळती थांबवण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे. उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी दोन विभागांत काम सुरू आहे.
दोन ठिकाणची गळती थांबवण्यासाठी अजून आठ दिवस लागतील, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू असली तरीही या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बोगद्यात रस्त्याच्या मधोमध रिकामी पिंपं उभी करण्यात आली आहेत. त्यावर रिफ्लेक्टर स्टीकर्स चिकटवण्यात आहे आहेत; मात्र ती पिंपं अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. या टनेलमधील कामे ठेकेदाराने लवकरात लवकर पूर्ण केल्यास मुंबईकडे जाणाऱ्या भुयारी मार्गावर रस्तादुभाजकाची गरज राहणार नाही, असा सूर वाहनचालकांमधून व्यक्त केला जात आहे.