सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वचरेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत असतानाच त्यात रेल्वेगाड्यांच्या ‘लेटमार्क’चीही पडलेली भर कायम आहे. १४ रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांची रखडमपट्टी होत आहे. शनिवारीही एलटीटी-मंगळूरसह एलटीटी-मडगाव एक्सप्रेस ५ तास विलंबाने धावली. अन्य १४ रेल्वेगाड्यांचेही वेळापत्रक विस्कळीत झाल्याने ‘विकेंड’ला झालेल्या रखडपट्टीने प्रवासी अक्षरशः मेटाकुटीस आले. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. ०१४२८ क्रमांकाची मडगाव- पनवेल स्पेशल ३ तास ५० मिनिटे, तर ०१४४८ क्रमांकाची करमाळी- पनवेल स्पेशल २ तास उशिराने रवाना झाली. ०९०५७ क्रमांकाची उधना मंगळूर स्पेशल ३ तास ४५ मिनिटे, तर १०१०३ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस २ तास विलंबाने धावली.
१०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास ४५ मिनिटे तर १२१३४ क्रमांकाची मंगळूर- सीएसएमटी एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. यापाठोपाठ १२२१८ क्रमांकाची केरळा संपर्कक्रांती एक्सप्रेस १ तास २५ मिनिटे तर १२४३१ क्रमांकाची तिरुवअनंतपूरम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस २ तास १० मिनिटे उशिराने रवाना झाली. १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे तर १२९७८ क्रमांकाची मरूसागर एक्सप्रेस ३ तास विलंबाने मार्गस्थ झाली. २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस १ तास तर १९५७८ क्रमांकाची जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस १ तास ३५ मिनिटे उशिराने धावली. अन्य दोन गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.