शहरातील पऱ्याची आळी येथे तीन ते चार तरुणांनी एका तरुणाच्या डोक्यात लादी घालून धारदार कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. हा प्रकार बुधवारी ता. ३० रात्री ८ वाजल्याच्या सुमारास घडला. जखमी झालेल्या नागेश प्रकाश गजबर वय २७, रा. कुवारबाव या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. भर बाजारपेठेत हा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागेश गजबार याच्यावर ज्यांनी हल्ला केला ते नागेशचे मित्र असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नागेश हा रिक्षाचालक असून त्याचा मित्र महेश गंगाराम शेळके रा. शांतीनगर, रत्नागिरी याने नागेशकडे उसने पैसे मागितले होते. त्यानुसार नागेश याने गळ्यातील सोन्याची साखळी गहाण ठेवून महेश याला १ लाख १० हजार रुपयांची रक्कम उसनी दिली होती.
माझे पैसे तू मला परत कर, असे नागेश वारंवार महेश याला सांगत होता. पैसे मागितल्याने महेश याला राग आला. नागेशला त्याने फोन करून पऱ्याची आळी येथे बोलावून घेतले. तेथे त्यांनी नागेशच्या डोक्यात लादी मारून त्याला जखमी केले. त्यातील एकाने कोयतीने वार पण केला; पण तो नागेशने हातावर झेलला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
नागेश स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला तेव्हा त्यांनी पाठलाग केला. नागेश त्या तिघांच्या तावडीतून निसटला. या प्रकरणी पोलिसांनी महेश गंगाराम शेळके रा. शांतीनगर, शुभम सोळंकी रा. गवळीवाडा व अन्य एक अनोळखी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गरजेच्यावेळी दिलेल्या उसने १ लाख १० हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून नागेश गजबार याच्यावर बुधवारी ता. ३० डिसेंबरला जीवघेणा हल्ला केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. हल्ला केल्यानंतर तिघेही संशयित फरार झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिस पथक त्यांच्या मागावर आहे.