गोव्यातील तिस्क उसगाव येथील त्या चिमुकलीची हत्या तंत्रमंत्राच्या प्रथेतून करण्यात आली असा संशय गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींतून व्यक्त होत असून त्यांनी शनिवारी फोंडा पोलिस स्थानकावर धडक मारली. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. हा तांत्रिक, मांत्रिक प्रकरणाचा भाग असू शकतो, हा नरबळीचा प्रकार आहे म्हणून पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, अशी मागणीही जनतेतून करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी जर त्या तांत्रिक, मांत्रिकाला पकडून आणले नाही तर आक्रमक झालेली जनता त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दाम्पत्याची खुनाची कबुली – दाम्पत्याने गुन्ह्याची कबुली देत मुलीचा खून केल्याची माहिती दिली आहे म्हणजे तिचा निघृण खून झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाची पाळेमुळे खोदून काढावीत अशी मागणीही जनतेतून होत आहे. एकंदरीत या भयानक प्रकाराने संपूर्ण गोव्यात संतापाची लाट पसरली आहे.
पाण्यात बुडवून मारले – दोन दिवसांपूर्वी तिस्क उसगाव (फोंडा तालुका) येथील अमयरा या ४ वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला होता. पाण्यात बुडवून तिला मारण्यात आले असा शवविच्छेदनाचा अहवालही समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून पप्पू उर्फ बाबासाहेब आलाट व पुजा आलाट यांना अटक केली होती. त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सदर ४ वर्षाची मुलगी ही कोकणातील रत्नागिरी शहरातील असून हे वृत्त सर्वत्र पसरताच खळबळ उडाली आहे.
फाशीची शिक्षा द्या! – अमयरा या चिमुकलीची हत्या करणाऱ्या क्रूर दाम्पत्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी जोरदार मागणी कसलये उसगावच्या नागरिकांनी केली आहे. हा प्रकार तांत्रिक, मांत्रिक प्रकराचाही भाग असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा असे सांगत त्यांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. या नागरिकांबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर, उसगाव गांजेच्या पं. स. सदस्य मनिषा उसगावकर व दुर्दैवी अमयराचे कुटुंबिय उपस्थित होते.
पोलिस स्थानकात धडकले – या संतप्त नागरिकांनी फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांची भेट घेतली. अमयराचा बळी घेतलेल्या दाम्पत्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी नव्हेतर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे तारा केरकर यावेळी म्हणाल्या. प्रत्येकाला आपली संतती प्रिय असते. गरीब, श्रीमंत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुणीही असो प्रत्येकाला आपल्या मुलांचा अभिमान असतो. परंतु अमयराच्या कुटुंबियांसारखा वाईट प्रसंग कोणावरही येऊ नये. याप्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे असे त्या पुढे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना घातले साकडे – दरम्यान यावेळी पं. स. सदस्या मनिषा उसगावकर म्हणाल्या की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री असल्याने तसेच मंत्री विश्वजीत राणे यांनी याप्रकरणाची दखल घेऊन संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करावी. हा प्रकार तांत्रिक, मांत्रिकाचा असू शकतो असे परिसरातील नागरिकांचे ठाम मत आहे. त्यामुळे तो तांत्रिक कोण याचा शोध पोलिसांनी घ्यावा. पोलिसांनी जर त्या तांत्रिक, मांत्रिकाला पकडून आणले नाहीतर हे आक्रमक झालेले लोक त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करतील असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.