महाराष्ट्रातून कर्नाटकात दाखल होणाऱ्या वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने राज्य सरकारने हा लक्षवेधी निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामधील हिरेबागवाडी टोलजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याने पुन्हा बॉर्डर वाद चिघळणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. या घटनेनंतर पुणे शहरातील स्वारगेट परिसरात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या किमान तीन बसेसला काळं फासलं आणि या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहिलं. याशिवाय, कर्नाटकातील बेळगाव जिल्हा प्रशासनानं सोमवारी महाराष्ट्रातील दोन मंत्री आणि नेत्यांना शहरात येण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.
कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकला जाणारी बससेवा पूर्णपणे बंद केली आहे. परिवहनच्या बसेस महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार नाहीत. कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं. पोलिसांशी चर्चा करून बससेवा बंद करण्याचा निर्णय परिवहन महामंडळानं घेतल्याचंही ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. सीमालगत भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद दिसून येत आहेत. नुकसानी आणि संरक्षणाच्या कारणास्तव बस सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमधील वाढता तणाव पाहता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. दरम्यान यासंबधी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.