रायगडच्या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. औद्योगिक वसाहतीच्या नदीपात्रात वापरलेले कोरोना चाचणी कीट आढळून आले आहे. अशी कीट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून आता करण्यात येतेय.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणाची समस्या नेहमीच चर्चेत आहे. कधी सांडपाणी लिकेज, कधी नदीपात्रात हिरवं, काळं, लाल पाणी वाहणं या समस्येमुळे नागरीक हैराण आहे. अशाच परिस्थितीत इथल्या नदीपात्रात चक्क वापरलेले कोरोना चाचणी कीटस आढळून आलेत. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचं सोबतच भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला असून कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जातेय. मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरापासून ते ग्रामीण भागांमध्ये देखील दिवसेंदिवस कोरोन बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेक जण घरीच क़्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत तर काहीना जाणवणाऱ्या त्रासाने काही रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. परंतु, गंभीर लक्षणे काहीच जाणवत नसल्याने, त्यांना उपचार करून डिस्चार्जड देण्यात आला आहे.
त्यामध्ये अशा प्रकारे कोरोना चाचणी करण्यासाठी वापरण्यात आलेले कीट्स आढळून आल्याने लोक भयभीत झाले आहेत. नक्की कोणी आणून टाकले हे किट याठिकाणी? याबाबत चर्चा सुरु आहे. मागील दोन वर्ष परिस्थिती किती कठीण होती हे डोळ्यासमोर असून देखील लोक एवढी बेफिकीर कसे काय वागू शकतात ! याबद्दल संताप व्यक्त केला जात असून, आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

