रत्नागिरी मधील सदोदित कार्यरत संस्था म्हणून महाजनी फाउंडेशनचे नाव प्रसिद्ध आहे. रत्नागिरीमध्ये सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासाठी काही प्रमाणामध्ये लॉकडाऊन घोषित केलेले असून सुद्धा विनाकारण फिरणारी लोकसुद्धा कारणीभूत आहेत. कोरोना हा संसर्गाने पसरणारा आजार असल्याने कुटुंबातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला तर शक्यतो इतर सदस्यांचाही अहवाल पॉझिटीव्ह येण्याची शक्यता असते. अशावेळी जर कुटुंबातील सर्वच मंडळी रुग्णालयामध्ये दाखल असतील तर कोण आणि कशाप्रकारे एकमेकांना सांभाळणार !
ही कोरोनाच्या स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरीतील महाजनी फाउंडेशनने कोविड जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवश्री हॉस्पिटल कारवांचीवाडी आणि पॉवरहाउस कुवारबाव येथील डॉ. आंबेडकर कोविड सेंटर येथील दाखल रुग्णांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. महाजनी फाउंडेशन कायमच अनेक मदत कार्यासाठी पुढाकार घेत असते, कै. शिवप्रसाद महाजनी वकील यांच्या अकाली निधनानंतर त्यांची समाजाप्रती असणारी बांधिलकी जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी रुची महाजनी यांनी त्यांच्या नावाची महाजनी फाउंडेशन ही संस्था २०१३ साली स्थापन केली.
कोविडच्या रुग्णांना मोफत भोजन सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय सेवा समितीशी संपर्क साधला असता , राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष श्री पावरी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अशाप्रकारे ३ कोविड सेन्टर्सना दररोज मोफत जेवण देण्याची व्यवस्था या दोन संस्थाच्या संलग्न उपक्रमातून सुरु आहेत.
महाजनी फाउंडेशन दरवर्षी विविध माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, लहान मुलांसाठी योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरीब पण शिकण्याची आवड असणार्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा पुरवठा करणे इ. अनेक उपक्रमांचा सहभाग आहे.