25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात महायुती फक्त फलकावरच, युतीमधील संबंध बिनसल्याचे चित्र

जिल्ह्यात महायुती फक्त फलकावरच, युतीमधील संबंध बिनसल्याचे चित्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचा मोठा परिणाम स्थानिक  पातळीवरील राजकारणावर झाला आहे. लोकसभेचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्ष आपली बांधणी करत आहे. महाविकास आघाडी किमान एका व्यासपीठावर एकत्र येताना दिसत आहे; परंतु भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीमध्ये अजूनही बिनसलेच आहे. पालकमंत्री सामंत एका बाजूने विकासकामाचा सपाटा लावत असताना विकासकामांच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाच्या बॅनरवर महायुती असली तरी प्रत्यक्ष कार्यक्रमात ती पहावयास मिळत नाही. लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

भाजप व शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी गटाकडून महायुतीसाठी दावा करण्यात येत आहे तर महाआघाडीतर्फे उबाठाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे; परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका नुकत्याच झाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील संबंध अजूनही ताणलेलेच दिसत आहेत. पक्षांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड रोष आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला बोलावणेच नाही.

सामंत यांनी महायुतीचा धर्म पाळताना सर्वच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे बॅनरवर छापली; परंतु, प्रत्यक्ष कार्यक्रमात मित्रपक्षांचे पदाधिकारी कुठेच दिसत नाहीत. त्यातही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपले फोटो बॅनरवर असले तरी आपल्याला बोलावणेच नसल्याचे सांगितले. त्यामुळे रत्नागिरी मतदार संघात आजही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मने जुळलेली नाहीत. भाजपचा एक गट तर उदय सामंत यांच्याशी जुळवून घेण्यासच तयार नाही. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. यात त्यांनी जिल्ह्यात ४ ठिकाणी बैठका घेतल्या. त्या चारही ठिकाणी पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला. या सभांना आघाडीचे पदाधिकारीही उपस्थित होते. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी मंचावर होते.

RELATED ARTICLES

Most Popular