सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २५ नोव्हेंबरला सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार विभागाचे ताब्यातील चार राज्य मार्गावरुन गेले दोन महिने १० ते १२ चाकी वाहनाद्वारे बॉक्साईड या खनिजाची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या संदर्भात विभागास तोंडी तक्रार देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने रस्त्याचे नुकसान, वाहतूक कोंडी व लहान वाहनांची अपघताची शक्यता वाढल्याने याचा जनतेला नाहक त्रास होत आहे. यामुळे जीवित वा वित्तहानी झाल्यास याची जबाबदारी कार्यालयाची राहील, असे सुचित करताना मार्गावरुन चालणाऱ्या मल्टीएक्सल गाड्यांची ओव्हरलोड वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील मागणी मान्य न केल्यास जनआंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याच आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या ताब्यातील रस्त्यावरुन चालणाऱ्या बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याकडे विभागाचे लक्ष वेधले आहे व वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
मंडणगड तालुक्यातील चार राज्य मार्ग व एका राष्ट्रीय महामार्ग यांचा वापर करुन उंबरशेत ते करंजाडी रेल्वे स्टेशन या मार्गाने सुरू असलेल्या ओव्हरलोड खनिज वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशसानाचे लक्ष वेधावे याकरिता उमरोली येथील अॅड. धनंजय विलास करमरकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंडणगड व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागीय कार्यालय महाड यांच्याकडे बेकायदेशीर वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन सादर केले आहे. परंतू, अद्यापही त्यावर कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही.