कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांसमोर रोज नवीन काहीतरी समस्या उभीच असते. यापूर्वीही अपवाद वगळता नेहमी न आढळलेले विषारी जेली फिश आत्ता कोकण समुद्रकिनाऱ्यावर सर्हास आढळू लागली आहेत. हे जेली फिश प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांतील किनारपट्टीवर आढळून येत आहेत. कोकणातील मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये जातात. त्यामुळे त्यांना विविध प्रकारची मासळीही भरपूर प्रमाणात मिळते. परंतु, मागील काही दिवसांपासून मच्छीमारांच्या जाळ्यात विषारी जेली फिश अधिक आढळून येत असल्याने, अगोदरच संकटात असलेल्या मच्छीमारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर कोणताच परिणाम झालेला दिसून आला नाही. त्यामुळे नियमित मासेमारी सुरू असून, जेली फिशचे मात्र नवीन संकट मच्छीमारांसमोर उभे आहे. किनारी भागाकडे मोठ्या प्रमाणात मासळी आली की जेली फिश येते, असा मच्छीमारांचा जुना अनुभव आहे. जेली फिशच्या संकटावर मात करीत मच्छीमारांना तारली आणि बांगडा, असा संमिश्र मासळीचा साठा मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सागरी भागात सुरमई, पापलेट, सरंगा, आदी मोथे मासे कमी प्रमाणात उपलब्ध असले, तरी तारलीच्या अमाप साठ्याने चांगलेच उत्पन्न मिळत आहे. त्याच्याबरोबर बांगडाही मोठ्या प्रमाणात मच्छीमारांच्या जाळ्यात मिळू लागला. या दोन्ही प्रजाती मिळत असल्याने मच्छीमारांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मासेमारीसाठी गेल्यावर जास्त फायदा होत नसला, तरी तोटाही होत नाही, अशा प्रकारे मासळी मिळत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यातच पर्ससीननेट मासेमारीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत.