शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्या माशाला बघण्यासाठी सायंकाळी रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मासा सुमारे ४० फूट लांब आणि १० ते १२ टन वजनाचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तो सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे किनारी भागात प्रचंड दुर्गंधी पसरलेली होती. भरतीची वाट पाहून किनाऱ्यावर आल्यानंतर माशाचे शवविच्छेदन करून तिथेच पुरण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मृत व्हेल मासे जिल्ह्याच्या किनाऱ्यावर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी गणपतीपुळे येथे ब्लू व्हेल माशाचे पिल्लू आढळून आले होते. त्याला वाचवण्यासाठी वनविभाग, स्थानिकांनी जिवाची पराकाष्टा केली होती.
ते पिल्लू समुद्रात सोडण्यात यश आले; मात्र दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ते मृतावस्थेत आढळले. त्यानंतर मिऱ्या समुद्रकिनारीही एक मृत व्हेल मासा वाहून आला होता. शनिवारी (ता. २०) मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत सापडल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. दुपारच्या सुमारास हा मासा समुद्रात दिसत होता. भरतीच्या लाटांमुळे तो हळुहळू किनाऱ्यावर वाहत आला. सायंकाळी मांडवी समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. मृत व्हेल किनारी आल्याचे समजताच किनाऱ्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी होती.
ही माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा मासा पाच ते आठ दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. तो पूर्ण सडला असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे वनविभाग भरतीची वाट पाहात आहे. रात्री उशिरा भरतीच्या लाटांबरोबर व्हेल किनाऱ्यावर येईल. तिथेच खड्डा काढून त्याला पुरण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.