परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने पुण्यासह अवघा महाराष्ट्र हादरला आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची ८ पथके रवाना झाली आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर हा प्रकार घडताच सारेच हबकले आहेत. पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती. सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिकडे गेला होता. आरोपी तिच्याशी बोलला अस सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे आणि त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेला हेदेखील दिसतं आहे. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि कुठे जाते आहेस असं विचारलं. त्यावर मुलीने फलटणला जायचं आहे, असं सांगितले, त्याने तिला सांगितलं बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते. चल मी तुला बसजवळ घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
अंधाराचा फायदा – पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या, बसमध्ये अंधार होता, त्यावर ती आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे. तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे. तुला हवं तर तू चेक कर. तिला बसमध्ये जायला सांगितलं. सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तसच मुलगीही उतरली.
मित्राला केला फोन – ती घराकडे निघाली अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला फोन करून सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं, असं उपायुक्त पाटील यांनी सांगितलं.
आरोपीचा शोध सुरू – आरोपी हा शिरुर गावातला आहे असं कळलं आहे. त्याची ओळख पटली आहे, त्याला शोधण्यासाठी आठ पथकं रवाना झाली आहेत. डॉग स्कॉडही शोधं घेतो आहे. असं स्मार्तना पाटील यांनी म्हटलं आहे.
अख्खा महाराष्ट्र हादरला – पुण्यातील स्वारगेटसारख्या बाराही तास गजबजलेल्या एसटी बसस्थानकात हा प्रकार झाल्याच्या वृत्ताने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाच्या प्रशासनावरही आरोप होऊ लागले आहेत.