मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कॉर्नर सभेमध्ये ना जोष पहायला मिळाला… ना जल्लोष दिसला. भाषणांमध्येही शिवसेनेच्या सभेची खासियत असणारी ठाकरी भाषादेखील आढळली नाही. कॉर्नर सभा असूनही या सभेला फारशी गर्दी झाल्याचे देखील पहायला मिळाले नाही. अनेक खुर्चा रिकाम्या होत्या. एकंदरीत या सभेची औपचारिकता पुर्ण करण्यात आली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी रत्नागिरीच्या साळवी स्टॉप परिसरातील जलतरण तलावाशेजारील मोकळ्या जागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी सायंकाळी ६ वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्या नियोजनानुसार सायंकाळी ५ वाजताच राधानगरीची सभा आटपून उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले. भाट्ये येथील हॉटेल कोहीनूरमध्ये ते उतरले होते. सभेला गर्दी होत नसल्याने सभा उशीरा सुरु झाली आणि लवकर संपली असे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ना जोष ना जल्लोष – खर तर शिवसेनेची सभा म्हणजे तिचा माहोल त्या दिवशी सकाळपासूनच बनलेला असतो. सारे वातावरण भगवामय असते. गावागावातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उत्साहात लवकरात लवकर सभास्थानी पोहचून आपली जागा निश्चित करतात असा आजवरचा रिवाज आहे. ठाकरे पोहचण्यापुर्वी सारे मैदान खचाखच भरलेले असते. गर्दी नाही म्हणून सभा उशीरा सुरु करण्याची वेळ आजवर कधीच आली नव्हती, मात्र मंगळवारी ती आली अशी चर्चा सुरु आहे.
खुर्च्छा रिकाम्या आहेत – सुत्रसंचालकांनी थेट माईकवरूनच खुर्च्छा रिकाम्या आहेत तेथे बसून घ्या असे आवाहन करताना नकळतपणे सभेला गर्दी नाही हा मेसेज जनतेपर्यंत पोहचविला. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात हा मेसेज व्हायरल देखील झाला.
ठाकरेंचे आगमन – शिवसेना नेत्यांची भाषणे गर्दी जमेस्तोवर लांबविण्यात आली. शेवटी ८ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे सभास्थानी आगमन झाले. व्यासपीठावरील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत ते थेट भाषणाला उभे राहिले. त्यावेळी देखील समोरच्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला नाही.
ठाकरी भाषा नाही? – उद्धव ठाकरेंच्या भाषणातही नेहमीचा जोष आढळला नाही. ठाकरीभाषा तर कुठेच नव्हती. एकंदरीत सभा जाहीर केली आहे आता ती पार पाडावीच लागेल या भुमिकेतून औपचारिकता पुर्ण करण्यात आली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाकरेंनींदेखील फार लंबे चवडे भाषण केले नाही. जेमतेम २०-२२ मिनिटं ते बोलले. मात्र नेहमीचा उत्साह दिसून आला नाही अशी प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.