जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी दिवसभर संततधार सुरू होती. पावसामुळे कुठेही नुकसान झालेले नसले तरीही जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत होती. तर वाशिष्ठी, शास्त्री, गडनदीसह काजळी, अर्जुना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने २० जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे तिन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी २६.९८ मिलिमीटर पावसाचा नोंद झाली. १ जूनपासून जिल्ह्यात सरासरी १९१२.२३ मिमि पाऊस झाला.
त्यात मंडणगड १९.७५, दापोली २६.७१, खेड १८.५७, १८. गुहागर २४, चिपळूण १२.८८, संगमेश्वर ३०.७५, रत्नागिरी ३२.५५, रत्नागिरी ३२.५५, लांजा २७.४०, राजापूर ५०.२५ मिमि नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवरून धावत होती. नदीची धोकापातळी ७ मीटर असून इशारा पातळी ५ मीटर इतकी आहे. सध्या ती नदी ५.२० मीटरवरून वाहत होती. अन्य नद्यांची पातळीही वाढलेली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार गुहागर पाचेरी अगार येथे रस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते. संगमेश्वर परचुरी येथील गोपाळ तानु गोणभरे संरक्षण भिंत कोसळून गोठ्याचे अंशतः नुकसान झाले.