मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत सर्वपक्षीय बैठक सुरु असतानाच मंत्रालयात आमदारांनी आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत काही आमदारांनी मराठा आरक्षणासाठी चक्क मंत्रालयालाच टाळे ठोकले. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जावू देणार नाही, मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवा अशी मागणी आंदोलन करणाऱ्या आमदारांपैकी काहींनी पत्रकारांशी बोलताना केली. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन तीव्र झालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही ठिकाणी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत.
त्याचबरोबर मराठा आंदोलनाची व्यापकता आता आणखी वाढली आहे. अनेक आमदार, खासदार आणि मंत्रीदेखील आंदोलनं करू लागले आहेत. मंत्रालयाबाहेर आंदोलन महाराष्ट्रातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आमदारांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद गटातील अनेक आमदार आणि खासदारांनी मंत्रालयाबाहेरच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या मागण्या करणारे पोस्टर्स झळकावली.
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, गरीब विद्यार्थी आणि मराठा तरुणांना लाभांपासून वंचित ठेवणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवा, अशा घोषणा आणि मागण्या करणारे पोस्टर्स राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी झळकावले. मंत्रालयाला ठोकले टाळे राष्ट्रवादीच्या आमदारांसह अन्य काही पक्षांच्या आमदारांनीदेखील मंत्रालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. काहीजणांनी मंत्रालयाला टाळे ठोकले. असे करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.