कारखान्याचे प्रदूषित सांडपाणी बंद करण्याच्या सूचना आपण वेळोवेळी दिल्या आहेत… ग्रामस्थांच्या बैठकीतही आपण अशाच सूचना दिल्या होत्या मात्र अर्धवट वाक्य घेऊन माझ्या बदनामीचे षड्यंत्र आखले गेले असून माझ्याबद्दल जनतेत गैरसमज पसरवण्याचे काम केले जात असल्याचे आ. शेखर निकम यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. कात कारखान्याचे प्रदूषित पाणी नदीमध्ये जात असल्याने आणि त्यातून विहिरी प्रदूषित झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांच्याकडे दाद मागितली. आ. निकम यांनी या संदर्भात ग्रामस्थ, संबंधित व्यवसायिक, पोलीस अधिकारी अशी बैठक बोलावली होती.
या बैठकीत दूषित पाणी कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे यासाठी उपाय योजना करण्याचे आपण संबंधितांना स्पष्ट सांगितले. या संदर्भात मी तुमच्या सोबत असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र ही चर्चा सुरू असताना एक-दोन जणांनी वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर आपण भावना व्यक्त केल्या. मात्र तोडामोड करून माझी वाक्य दाखवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मुळात जे ग्रामस्थ होते ते दुसऱ्या गावातील नव्हते. माझ्या घरातील ही मंडळी आहेत, असे असताना जे चित्र बाहेर दाखवले जात आहे त्या मागचा हेतू नेमका कळत नाही असा सवाल आ. निकम यांनी केला,
गैरकाम केले नाही – मी कधी गैरकाम केले नाही आणि असे कोण करीत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचे कामही कधी केले नाही. राजकारणासाठी कधी कोणाचा वापर केला नाही की एखादा विषय राजकारण म्हणून बघितला नाही. मात्र मला यामध्ये नाहक गुंतवून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे काम केले जात आहे असे आ. शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चुकीचे ते चुकीचेच ! – मी वेळोवेळी संबंधितांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जे चुकीचे आहे ते चुकीचेच म्हणणारे आम्ही आहोत, चुकीची पाठणराखण कधी केली नाही आणि करणारही नाही. मात्र हा विषय घेऊन मागची-पुढची वाक्य न दाखवता तेवढेच वाक्य घेऊन दाखवले जाते हे दुर्दैवी आहे. मात्र असा गैरसमज कुणी पसरवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सत्य माहित असल्याचे आ. निकम यांनी स्पष्ट केले आहे.
निलेश राणे आज येणार – दरम्यान या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे हे शुक्रवारी सावर्डेमध्ये येत असून ते संबंधितांशी चर्चा करुन वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत.