महाविकास आघाडीमध्ये असलेली नाराजी गुरुवारी पालपेणेमध्ये झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यादरम्यान उघड झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या मेळाव्यात महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांचे भाषण मध्येच आ. भास्कर जाधव यांनी थांबविल्याने गीते नाराज झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यात हाच एक. चर्चेचा विषय बनला आहे. महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अंजनवेल जि.प.गटाचा मेळावा गुरुवारी पालपेणे येथे आयोजित करण्यात आला होता.
नेतेमंडळींची भाषणे झाली. उमेदवार अनंत गीते हे बोलायला उभे राहिले. काही वेळानंतर ते म्हणाले, ‘मागील लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्कर जाधवांच्याविरोधात लढलो होतो. गीतेंनी हे उद्गार काढताच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आ. भास्कर जाधवांनी गीतेंना थांबवले असे वृत्त व्हायरल झाले आहे. गीतेंना मध्येच थांबवत आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, ‘सॉरी गीतेसाहेब… मला असं वाटतं हे बोलणं आता टाळलं पाहिजे. कारण या वाक्याचा वेगळा अर्थ लावून प्रचार केला जातो आहे.
मी राष्ट्रवादीत होतो म्हणून तटकरेंच्या बाजूने होतो. पक्षात राहून मी कधी गद्दारी केली नाही’, असे सांगत आ. भास्कर जाधव खाली बसले. त्यानंतर गीतेंनी जाधवसाहेब माझे पुढचे वाक्य आता ऐका, असे म्हणताच आपल्या प्रत्येक सभेतील भाषणे मी ऐकली आहेत, असे सांगत भास्कर जाधव यांनी नाराजी दर्शविल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर गीतेंनी विषय बदलत आपले पुढले भाषण पूर्ण केले. मात्र या प्रकारचे वृत्त सोशल मीडियावर गुरुवारी रात्री व्हायरल होताच चर्चांना पेव फुटले आहे.
या प्रकारानंतर अनंत गीते नाराज झाल्याची चर्चा सुरू असून ते मेळावा संपताच भोजनासाठी थांबले नाहीत. वेळणेश्वरच्या पुढील सभेसाठी मी जातो, असा मेसेज देत गीते तत्काळ पालपेणेतून भोजन न घेताच निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.